राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५६ ते २०० कोटींपर्यंत थकबाकी आहे. मात्र, उर्वरित २७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडील थकबाकीचे प्रमाण ४०० ते २८५७ कोटींपर्यंत आहे. त्यातील जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नगर या १७ जिल्ह्यांतील शेतकरी सर्वाधिक थकबाकीत असल्याचेही त्या आकडेवारीतून दिसते. सध्या बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बँकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत.